देशाच्या सुरक्षेसाठी ‘समतोल’ ची निगराणी पथके होणार रेल्वे स्टेशनवर सक्रीय

मुंबई , नोव्हेंबर २६ : समतोल फौंडेशन या संस्थेने देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक अभिनव पाउल उचलायचे ठरविले आहे. २६/११ मुंबई हल्ल्याला आठ वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर समतोल संस्थेने सुरक्षा यंत्रणांना सहकारी म्हणून राज्यातील विविध रेल्वे स्टेशनांवर आता निगराणी पथके स्थापन करण्याचे ठरविले आहे.

विविध कारणांमुळे घरातून पळून मुंबईसारख्या महानगरांमध्ये येणाऱ्या लहानग्याना मदत करणाऱ्या या संस्थेच्या कार्यकर्त्यांचे जाळे राज्यातील प्रमुख रेल्वे स्टेशनांवर आहे. याच नेटवर्कचा उपयोग करून हे कार्यकर्ते संशयितांवर नजर ठेऊन राहातील व काही संशयास्पद हालचाल जाणवली तर रेल्वे स्थानकांवर सुरक्षा यंत्रणांना लगेच माहिती देतील, अशी माहिती ‘समतोल’ चे सचिव विजय जाधव यांनी दिली आहे.

गेली १२ वर्षे रेले स्टेशनावर अश्या प्रकारचे काम करणारी महाराष्ट्रातील ही एकमेव संस्था आहे.

विजय जाधव पुढे म्हणाले कि २६ ११ रोजी पाकिस्तानी आतंकी कसाब व त्याच्या साथीदारांनी मुंबई छत्रपती टर्मिनस वर अंदाधुंद गोळीबार केला होता. त्यावेळी पोलिस, एन एस जी कमांडोंनी आपल्या जिवाची बाजी लावून देशाचे रक्षण केले. परंतु देशाची सुरक्षा ही सामानी नागरिकाच्या सातरकतेवर ही अवलंबून असते. त्यामुळे महाविद्यालयीन युवक व नागरिकांनी देशाच्या सुरक्षे साठी समतोल च्या या अभिनव उपक्रमांत ‘समतोल मित्र’ बनून सहभागी व्हायचे आवाहन समतोल तर्फे करण्यात येत आहे. 

विजय जाधव यांनी पुढे सांगीतले की महाराष्ट्रातील मुंबई छत्रपति शिवाजी टर्मिनस, दादर, कुर्ला, कल्याण टर्मिनस व मुंबई बाहेर पुणे व भुसावळ या अति-महत्वाच्या रेल्वे स्थानकांवर समतोल संस्थेचे कार्यकर्ते दिवसरात्र पळून येणाऱ्या लहान मुलांवर लक्ष ठेऊन असतात. हि मुले स्टेशनवरील असामाजिक घटकांसोबत जोडली जाऊ नयेत यासाठी त्याना मनपरीवर्तन शिबिरात आणून त्यांच्या पालकांकडे सुपूर्द करण्याचे काम समतोलचे कार्यकर्ते करीत असतात.

या पुढील काळात हेच कार्यकर्ते रेल्वे स्टेशनवर घडणाऱ्या व देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील घटना व हालचाली यावरही लक्ष ठेवतील.