२८ वे मनपरिवर्तन शिबीर

२८ वे मनपरिवर्तन शिबीर

 

Send- Off

 

 

 

 २८ वे कॅम्प हा मनपरिवर्तन शिबिराचा ठरवून केलेला कार्यक्रम हे या शिबिराचे वैशिष्टय होते.

२५ सप्टेंबर ला चालू केलेले शिबीर १४ नोव्हेंबर या बालदिनी समारोप करायचे असे ठरलेले असल्यामुळे कार्यक्रम त्याप्रमाणे होत होते. तसेच नेहमीप्रमाणे ४५ दिवसांचे शिबीर हे असणारच होते. २५ सप्टेंबर रोजी नवीन मुले, मुलांसाठी नवीन जागा, आजूबाजूला खूप झाडी त्यामुळे जंगल, बाजूला न दिसणाऱ्या घरांमुळे मुलांना पहिला हफ्ता राहायला थोडा जड गेला. कार्यकर्त्यांची या वेळेस मुलांना सांभाळण्यासाठी खरी कसोटी असते. प्रत्येक वेळेला नवीन अनुभव हा शिबिरात असतोच त्याचप्रमाणे या वेळीही आला.

शिबिरातील एका मुलाने काही मुलांचे ग्रुप बनवून पळून जाण्याची तयारी केली. रात्री २.३० वाजता २६ सप्टेंबर ला तीन मुलांनी कार्यकर्त्यांनी ठेवलेले सामान असलेली कपाटे पक्कड, स्क्रू ड्राईव्हरणे तोडली व त्यातून काही पैसे चोरले. कडी खोलण्याचा खुप प्रयत्न केला व निघू शकली नाही म्हणून बाहेर पडता आले नाही. सकाळी सर्वाना हा विषय कळला. कार्यकर्त्यांनी मुलाला विचारायला सुरवात केली. परंतु कोणावरही दबाव टाकला नाही कारण हे शिबिरात नेहमीच होते. काही न घडल्यासारखे पुन्हा वातावरण झाले. काही मुलांवर लक्ष ठेवून कार्यकर्ते होते. चार दिवसानंतर मी स्वतः शिबिरात गेलो. तोपर्यंत कोणालाही बाहेर जाऊ देऊ नका म्हणालो. म्हणजे पळून जाणार नाही कोणी याची काळजी घ्या असे सांगितले होते. रात्रीच्या खुल्या वातावरणात मुलांबरोबर गप्पा सुरु झाल्या. ज्यांनी चोरी केली त्यांचे मन त्या वातावरणात बदलले कि काय त्यांनी स्वतःच गुन्हा कबुल केला. पळून जावेसे वाटले, भीती वाटली म्हणून चोरी केली असे सांगितले. सर्वांनी एकमताने त्याचा स्वीकार करून परत असे कोणी करू नये म्हणून शपथ घेतली व वातावरण अजूनच आनंदी झाले. त्या दिवसापासून शिबिरातून कोणी पळूनही गेले नाही व चोरीही झाली नाही.

ऑक्टोबर महिन्यामध्ये मुलांनी दिवाळीची तयारी करायला सुरवात केली. दिवे रंगवणे, रंगकाम करणे, आकाश कंदील, पेपर रद्दी पासून पेपर पिशवी बनवणे, प्रार्थना पाठ करणे, खेळ, शिस्त या सगळ्यांना मुलांनी चांगलाच प्रतिसाद दिला. २८ व्या मनपरिवर्तन शिबिरात साधारणतः २५० च्या दरम्यान लोकांनी भेटी दिल्या. त्यामध्ये अखिल भारतीय धर्म जागरण प्रमुख राष्ट्रीय स्वयंसेवक संघ श्री शरदरावजी ढोले यांनी मुलांना न्यायाधीश व्हा व देशातील न्यायव्यवस्था मजबूत बनवा अशी न्यायमूर्ती रानडे यांची गोष्ट सांगितली व पळून आले म्हणजे गुन्हा केला नाही तर ज्ञान प्राप्त करण्यासाठी पळा व स्वतःच्या कुटुंबाचा व देशाचा विकास करा असा संदेश देऊन मनपरिवर्तन केले.

 मुलांचा उत्साह वाढविण्यासाठी १० मेरेथोन मध्ये धावण्याच्या शर्यतीत भाग घेणारे धीरज वाधवानी यांनी शिबिराला भेट देऊन देशासाठी धावा असे म्हणत पळण्याची व्याख्यचं बदलून टाकली व मुलांना मार्गदर्शन केले.

सर्पमित्र, अंधश्रद्धा निर्मुलन, वैद्यकीय तपासणी, खेळकुद याचा पुरेपुर आनंद मुलांनी घेतला. ८ ते १२, १२ ते १५ व १५ पुढील वयोगट असे तीन गटामध्ये मुले शिबिरात होती. एकूण ३२ मुलांपैकी २५ मुले शेवटच्या सामारोपा पर्यंत शिबिरात होती कारण २५ मुलांना घेऊनच आपण शिबीर करतो. काही पालकांनी शिबिरातून मुले घेऊन गेली त्याच्या बाबतीतही आम्ही नियोजन केले होते.

नोव्हेंबर महिन्यामध्ये दोन कार्यक्रम एकदम येणार होते. १४ नोव्हेंबर बालदिन म्हणून साजरा करायचा होता पण नेहमीप्रमाणे करतात तसा न करता पालकांना आनंद देणारा करायचा होता. ज्या मुलांमुळे पालकांना त्रास झाला होता त्याच मुलांमुळे बालदिन म्हणजे मुलाची अनेक महिन्यांनी, वर्षांनी पालकांशी भेट करायची असे ठरवले. परंतु याच दिवशी त्रिपुरा पौर्णिमा असल्यामुले समतोलचा दिपोत्सव कार्यक्रमही याच दिवशी करायचा असतो. गेली ४ वर्षे दीपोत्सव कार्यक्रम आपण याच दिवशी करत आहोत.

एक दिया समतोल के लिये हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असल्यामुळे यावेळी किमान २५० दिवे लावले गेले. संध्याकाळी कार्यक्रम सुरु होण्या अगोदर अंध मुलांनी गाण्याचा कार्यक्रम सुरु करून उपस्थितांची मने जिंकली. सकाळच्या कार्यक्रमामध्ये ठाण्याला किमान २०० मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये पालकांना मुले हस्तांतरण करण्यात आली. प्रमुख उपस्थिती मध्ये संजय जी केळकर ठाणे शहर आमदार, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी प्रमुख श्री राजू पाटील सर, अरुणजी करमकर ज्येष्ठ पत्रकार, संजयजी हेगडे सेवा सहयोग, विजय जाधव व बालप्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अश्या प्रकारे १४ नोव्हेंबर हा दिवस समतोलच्या मनपरिवर्तन शिबिराच्या समारोपाचा व दिपोत्सवाच्या कार्यक्रमाचा आठवणीतला दिवस राहिला.

 

१४ नोव्हेंबर ला बालदिन आला

मनपरिवर्तन शिबिराचा समारोप झाला.

दीपोत्सवात दिवे लावून,

मुलांनी व पालकांनी आनंद व्यक्त केला.